आजची ही गोष्ट माझी नाही...
ही आहे एका अशा काकांची, ज्यांनी त्यांचं लहानपण फक्त जगलं नाही... तर प्रत्येक दिवस जगून घेतला. डोंगर-दऱ्या पालथ्या घातल्या, पावसात भिजले, उन्हात भाजले, तहानेने व्याकुळ झाले, मित्रांसोबत रात्रभर भटकलो... आणि त्या प्रत्येक क्षणाला आठवण बनवून ठेवली.
आज ते अनुभव ऐकताना मला एक गोष्ट सतत जाणवत होती...
आठवणी कधीच मोठ्या घटनांमधून जन्माला येत नाहीत... त्या जन्माला येतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून.
आणि आजच्या या सगळ्या आठवणींची सुरुवात झाली...
एका छोट्याशा स्टोव्हपासून.
कालच माझा नवीन ट्रेकिंग स्टोव्ह डिलिव्हर झाला होता.
सकाळीच तो उघडून पाहिला. प्रत्येक पार्ट हातात घेऊन बघितला. पेटवून पाहिला. अगदी नीट चालतोय ना याची खात्री करून घेतली. नवीन वस्तू घेतल्यावर जो एक वेगळाच आनंद असतो ना... तसाच काहीसा.
मग सहज वाटलं...
"चल, काकांना दाखवून येतो."
स्टोव्ह हातात घेऊन मी त्यांच्या घरी गेलो.
"काका, बघा... नवीन स्टोव्ह घेतलाय ट्रेकसाठी."
मी त्यांना मागच्या आठवड्यातल्या ट्रेकमध्ये बनवलेल्या मॅगी आणि चहाची रील दाखवली.
रील संपली.
त्यांनी मोबाईल माझ्या हातात दिला.
आणि म्हणाले...
"अरे... असं फॅन्सी काही नव्हतं रे आमच्या वेळी..."
मी खुर्चीत व्यवस्थित बसलो.
कारण मला कळलं होतं...
आता काहीतरी भारी ऐकायला मिळणार आहे.
"आमच्या वेळी ट्रेक म्हणजे फक्त बॅग भरून निघणं नव्हतं."
ते सांगायला लागले.
"सगळ्यात आधी रॉकेलचा स्टोव्ह तयार करायचा.
तो आजच्या स्टोव्हसारखा एकाच तुकड्यात नसायचा.
पूर्ण डिटॅचेबल.
एकेक पार्ट वेगळा.
एका पिशवीत त्याचे सगळे भाग.
वेगळी रॉकेलची बाटली.
सगळं काळजीपूर्वक भरायचं...
आणि मग तो स्टोव्ह पाठीवर घेऊन डोंगर चढायचे."
हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत आजही तीच चमक होती.
"जिथे जागा मिळेल...
तिथे स्टोव्ह जोडायचा.
रॉकेल भरायचं.
पंप मारायचा.
पेटवायचा.
आणि मग सुरू व्हायची आमची स्वयंपाकघर."
मी डोळ्यासमोर ते दृश्य उभं करू लागलो.
एखाद्या डोंगराच्या कडेला...
चार मित्र...
मध्ये रॉकेलचा स्टोव्ह...
त्यावर उकळत असलेलं पाणी...
कोणी मॅगी टाकतोय...
कोणी मसाला घालतोय...
कोणी चहा ढवळतोय...
आणि आजूबाजूला फक्त वारा...
डोंगर...
आणि मित्रांच्या हसण्याचा आवाज.
ते पुढे म्हणाले,
"एकदा सकाळी खूप लवकर ट्रेकला निघालो होतो.
डोंगर चढायला सुरुवात केली...
आणि अर्धा डोंगरही चढलो नसेल, तोपर्यंत सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले."
ते हसले.
"आजूबाजूला काहीच नव्हतं.
ना गाव...
ना हॉटेल...
ना टपरी...
ना माणूस."
"मग?"
मी उत्सुकतेने विचारलं.
"मग काय...
डोंगरातच जागा शोधायला सुरुवात केली."
ते हातानेच डोंगराचा आकार दाखवत म्हणाले,
"डोंगराला जसं एखादं खबदाड पडलेलं असतं ना...
तशी एक जागा सापडली.
मग तिथे मोठमोठे दगड रचले.
मध्ये चूल पेटवली.
आणि तिथेच मस्त मॅगी बनवली."
हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं...
ते पाहून मला एक गोष्ट जाणवली.
आज आपण हजार रुपयांच्या कॅफेमध्ये बसून मॅगी खातो...
पण त्या डोंगरावर, मित्रांसोबत, स्वतः चूल पेटवून खाल्लेल्या त्या मॅगीची चव...
कदाचित आयुष्यात पुन्हा कधीच मिळत नसेल.
"पाणी?"
मी सहज विचारलं.
ते अगदी सहज म्हणाले,
"अरे... डोंगरात पाणी मिळायचंच.
कुठे धार...
कुठे झरा...
कुठे टाकं...
त्याची आम्हाला चिंता नव्हती."
मी मात्र त्यांच्या गोष्टीत हरवून गेलो होतो.
मनात सतत एकच चित्र फिरत होतं...
डोंगर...
गार वारा...
मित्रांची टोळी...
मधोमध उकळणारी मॅगी...
आणि कोणालाच घाई नाही.
कोणाला नेटवर्कची चिंता नाही.
कोणाला फोटो काढायचे नाहीत.
कोणाला स्टोरी टाकायची नाही.
फक्त...
तो क्षण जगायचा आहे.
ते बोलत होते...
आणि मी मनात विचार करत होतो...
किती साध्या गोष्टी होत्या... पण किती श्रीमंत आयुष्य होतं!
"चल..."
काका पुन्हा म्हणाले.
"आता तुला खरी गोष्ट सांगतो..."
आणि तिथून सुरू झाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय ट्रेक...
सप्तशृंगीच्या मागच्या तीन किल्ल्यांचा...
जवळ्या, रावळ्या आणि धोडपचा...
ते थोडे पुढे सरकले.
जणू त्यांच्या डोळ्यांसमोर तो संपूर्ण प्रवास पुन्हा उभा राहिला होता.
"सप्तशृंगीच्या मागे तीन किल्ले आहेत...
जवळ्या...
रावळ्या...
आणि धोडप."
मी मान हलवली.
त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली.
"आता हे नाव ऐकायला जितकं सोपं वाटतं ना...
तितकाच तो ट्रेक कठीण होता.
आज Google Maps वर तो रस्ता बघितलास तरी मन हलून जातं.
एवढं अंतर...
एवढे डोंगर...
आणि त्या काळात..."
ते थोडंसं हसले.
"...ना GPS...
ना मोबाइल...
ना ट्रेकिंग ॲप्स...
ना कुठलं डिजिटल मॅप."
क्षणभर थांबून ते म्हणाले,
"फक्त आम्ही...
आमची पिशवी...
आणि समोर दिसणारा डोंगर."
तो तब्बल पाच-सहा दिवसांचा ट्रेक होता.
भर पावसाळा.
सतत कोसळणारा पाऊस.
डोंगरावरून ओघळणारे पाण्याचे लहान मोठे प्रवाह.
पायाखाली निसरडी माती.
एक चुकीचं पाऊल...
आणि थेट दरी.
"जवळ्यापासून आम्ही सुरुवात केली."
ते हातानेच पुढचा रस्ता दाखवत असल्यासारखे सांगत होते.
"एकेक पाऊल टाकत पुढे सरकत होतो.
कधी एखाद्या झाडाला धरून...
कधी दगड पकडून...
तर कधी समोरचा मित्र हात द्यायचा."
मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो.
त्या आठवणी ते फक्त सांगत नव्हते...
त्या पुन्हा एकदा जगत होते.
"रात्र झाली की..."
ते पुढे म्हणाले,
"ज्या किल्ल्यावर पोहोचू...
तिथेच मुक्काम.
कुठे एखादी गुहा.
कुठे एखादा पडका वाडा.
किंवा एखादी सुरक्षित जागा मिळाली...
की तिथेच रात्र काढायची."
दुसऱ्या दिवशी...
पहाटे डोळे उघडले की पुन्हा बॅग पाठीवर...
आणि पुढच्या किल्ल्याकडे चालायला सुरुवात.
हे ऐकताना माझ्या मनात एकच प्रश्न आला.
मी लगेच विचारलंच.
"काका...
पण तेव्हा GPS नव्हतं.
मग रस्ता कसा शोधायचात?"
ते मोठ्याने हसले.
"अरे...
हा प्रश्न प्रत्येकजण विचारतो."
"त्या काळी रस्ता दाखवायला Google नव्हतं...
माणसं होती."
ते म्हणाले.
"समोर एखादा गड दिसला...
की त्याच्याकडे बोट दाखवायचं...
आणि म्हणायचं...
'तो बघ... आपल्याला तिथे जायचं आहे.'
बस्स.
मग दिसेल त्या वाटेने चालत राहायचं."
ते हसत म्हणाले,
"आजची मुलं दहा मिनिटं नेटवर्क गेलं तरी घाबरतात.
आम्ही तर पाच दिवस नेटवर्क म्हणजे काय हेच माहिती नसताना फिरायचो."
मीही नकळत हसलो.
खरंच...
आज आपण प्रत्येक वळणासाठी मोबाइलकडे बघतो.
आणि ते...
फक्त डोंगरांकडे बघून रस्ता शोधायचे.
इतक्यात त्यांनी त्या ट्रेकमधला एक प्रसंग सांगितला...
जो ऐकताना मलाही नकळत तहान लागली.
"रावळ्या मागे पडला...
आणि आम्ही धोडपच्या दिशेने चालायला लागलो.
तीन दिवस सतत पावसात चाललो होतो.
कपडे भिजलेले.
बूट भिजलेले.
आणि आजूबाजूला सगळीकडे पाणीच पाणी."
ते थोडे थांबले.
"पण अचानक...
पाऊस थांबला."
क्षणात सगळं बदललं.
समोर कोरडा डोंगर.
वर तळपणारं ऊन.
आणि पिण्यासाठी एक थेंबही नाही.
"तहान लागली होती...
पण वाटलं...
डोंगर आहे...
पुढे कुठेतरी पाणी मिळेल."
म्हणून सगळे चालत राहिले.
चालत राहिले.
आणि शोधत राहिले.
"बराच वेळ झाला...
पण पाणी काही सापडेना."
ते सांगत होते आणि मी मनात तो डोंगर पाहत होतो.
ना आवाज.
ना माणूस.
फक्त डोंगर.
आणि तहान.
"शेवटी...
खूप शोधल्यावर...
एक अगदी बारीकशी धार दिसली."
त्यांनी दोन बोटांमध्ये अंतर दाखवलं.
"एवढीशी."
ती धार कुठून येत होती...
तेही माहिती नव्हतं.
पण त्या क्षणी...
तीच आमच्यासाठी नदी होती.
"मग काय...
एक मोठं पान तोडलं.
त्या पानात हळूहळू पाणी जमा करायचो...
आणि एकेक घोट पिऊन तहान भागवली."
हे सांगताना त्यांच्या आवाजातला भाव बदलला.
ते शांतपणे म्हणाले,
"त्या दिवशी कळलं... माणसासाठी पाणी म्हणजे काय."
त्यांचं ते एक वाक्य...
काही क्षण हवेतच थांबलं.
मी काहीच बोललो नाही.
मनात फक्त एकच विचार आला...
आपण रोज सहज उघडणारा नळ...
कधी कधी त्याची किंमत कळण्यासाठी...
बहुतेक एखादा डोंगर चढावा लागतो.
"चल..."
काका पुन्हा हसत म्हणाले.
"आता तुला सांगतो... आमच्या आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग..."
काका क्षणभर शांत झाले.
त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं...
पण डोळ्यांमध्ये आता एका वेगळ्याच आठवणी उमटल्या होत्या.
"ट्रेक म्हणजे फक्त मजा नसते रे..."
ते हळूच म्हणाले.
"कधी कधी तो तुला जगणं शिकवतो."
मी काहीच बोललो नाही.
फक्त ऐकत राहिलो.
"असाच एकदा उन्हाळ्यातला ट्रेक होता."
ते सांगायला लागले.
"कडक उन्हं.
डोक्यावर अक्षरशः आग पडत होती.
डोंगरावर झाडं फारशी नव्हती.
सावली तर सोडूनच दे."
ते हातानेच त्या मोकळ्या डोंगराचा आकार दाखवत होते.
"आम्ही चालत होतो...
आणि अचानक माझ्या पायाला जोराचा क्रॅम्प आला."
त्यांनी पायाकडे पाहतच सांगितलं.
"एक पाऊलही पुढे टाकवत नव्हतं."
मी सहज विचारलं,
"मग?"
ते म्हणाले,
"मित्रांना थांबवून काय उपयोग?
सगळ्यांचा ट्रेक थांबला असता."
म्हणून त्यांनी मित्रांना सांगितलं,
"तुम्ही पुढे व्हा... मी थोडा वेळ बसतो. मागे येताना मला एक पाण्याची जागा आठवतेय. तिकडून पाणी घेऊन येतो. तुम्ही काळजी करू नका."
मित्र पुढे निघून गेले.
आणि ते...
त्या डोंगरावर एकटेच राहिले.
"क्रॅम्प थोडा कमी झाला...
तसं मी पाण्याच्या शोधात निघालो."
ते म्हणाले.
"मला खात्री होती...
इथे कुठेतरी पाणी आहे."
कारण...
मागच्या वेळी ते त्याच वाटेने गेले होते.
आणि त्यांना ती जागा स्पष्ट आठवत होती.
"पण..."
ते थोडं हसले.
"...डोंगराला स्वतःचीच इच्छा असते."
मी त्यांच्याकडे पाहिलं.
"ती जागाच सापडेना."
ते एका दिशेने गेले.
मग दुसऱ्या.
पुन्हा मागे आले.
परत पुढे गेले.
पण...
जणू ती पाण्याची धार पृथ्वीवरूनच नाहीशी झाली होती.
ते सांगत होते...
आणि माझ्या डोळ्यांसमोर त्या डोंगराचं चित्र उभं राहत होतं.
तळपणारं ऊन.
अंगातून निघून गेलेली ताकद.
ओठ कोरडे पडलेले.
आजूबाजूला एकही माणूस नाही.
फक्त शांतता.
आणि तीही अंगावर येणारी.
"चार-पाच तास..."
ते शांतपणे म्हणाले.
"मी पाण्याशिवाय तिथेच होतो."
चार-पाच तास...
हे ऐकताच मी नकळत त्यांच्याकडे पाहिलं.
आज आपण अर्धा तास पाणी मिळालं नाही तरी अस्वस्थ होतो.
आणि हे...
डोंगराच्या मध्यभागी...
एकटे...
पाच तास.
"नंतर..."
ते पुढे म्हणाले,
"शरीराने साथ सोडायला सुरुवात केली."
थकवा.
तहान.
उन्हं.
सगळं एकत्र आलं.
"मधेच कधी डोळा लागला...
तेही कळलं नाही."
बराच वेळ गेला.
तोपर्यंत त्यांचे मित्र ट्रेक पूर्ण करून परत येत होते.
ते मित्र त्यांना शोधायला लागले.
आणि बराच वेळ शोधल्यानंतर...
शेवटी ते त्यांच्यापर्यंत पोहोचले.
त्यांना उठवलं.
आणि त्या पाण्याच्या जागेवर घेऊन गेले.
पहिला घोट पाणी पिल्यानंतर...
ते काही क्षण काहीच बोलले नाहीत.
मग हसले.
आणि मित्रांकडे बघून म्हणाले,
"लेका... अशी ॲडव्हेंचर केलीस ना... तर आयुष्यात कुठेही जा. कुठलीही परिस्थिती समोर येऊ दे... तिला हसत हसत पार करायची शिकवण हे ट्रेक, हे डोंगर आणि या आठवणी देतील."
मी त्यांचं ते वाक्य ऐकत बसलो होतो.
खरंच...
ट्रेक आपल्याला फक्त डोंगर चढायला शिकवत नाही.
तो शिकवतो...
संयम.
विश्वास.
साथ.
आणि सर्वात महत्त्वाचं...
कुठल्याही परिस्थितीत न हार मानता पुढे चालत राहायचं.
माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून काका म्हणाले,
"अरे...
हे तर अजून काहीच नाही."
मी लगेच विचारलं,
"म्हणजे?"
ते हसले.
"तुला हरिहरेश्वरच्या सनसेटचा किस्सा सांगतो..."
काका हसत म्हणाले.
त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा मिश्किल हसू आलं होतं.
जणू हा किस्सा ते कित्येक वेळा सांगूनही प्रत्येक वेळी नव्यानेच जगत असावेत.
"आम्हाला एकदा हरिहरेश्वरचा सनसेट बघायचा होता."
ते म्हणाले.
"आता आजच्यासारख्या बाइक्स नव्हत्या रे त्या वेळी.
ना इतकी पॉवर...
ना इतकी कम्फर्ट.
पण हट्ट होता...
सनसेट चुकवायचा नाही."
मग काय...
गाडी सुरू केली.
आणि निघालो.
ते हातानेच रस्त्यावरून धावणाऱ्या बाईकचा इशारा करत म्हणाले,
"जवळजवळ पंच्याण्णवच्या स्पीडने...
नॉनस्टॉप."
आजच्या काळात ९५ चा स्पीड काही मोठी गोष्ट वाटणार नाही.
पण त्या काळच्या गाड्यांवर...
त्या रस्त्यांवर...
तो स्पीड म्हणजे वेडच.
"शेवटी..."
ते हसले.
"सनसेटच्या आधी आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो."
क्षणभर ते शांत झाले.
जणू त्या समुद्रकिनाऱ्यावरचा तो संध्याकाळचा क्षण पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
"आजही...
मी आणि माझी बायको...
हा किस्सा जेव्हा जेव्हा बोलतो...
तेव्हा ते दृश्य पुन्हा समोर उभं राहतं."
मी त्यांच्याकडे पाहत होतो.
त्यांनी सनसेटचं वर्णन केलं नाही.
समुद्राचंही नाही.
पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून...
तो संपूर्ण क्षण माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता.
इतक्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात अजून एक प्रश्न आला.
मी विचारलं,
"काका...
तुम्ही एवढे रोड ट्रिप्स करायचात...
एवढे डोंगर फिरायचात...
पण तेव्हा GPS तर नव्हतं.
मग नेमकं रस्ता शोधायचात कसा?"
माझा प्रश्न ऐकून ते मोठ्याने हसले.
"तुमच्या पिढीला हे ऐकून विश्वासच बसत नाही."
ते म्हणाले.
"GPS तर खूप नंतर आला.
त्याआधी आमच्याकडे असायची...
मॅपची पुस्तकं."
"पुस्तकं?"
मी आश्चर्याने विचारलं.
"हो...
पूर्ण पुस्तक."
ते हाताने पुस्तक उघडल्यासारखं करत म्हणाले,
"प्रवासाला निघायचो तेव्हा ते मॅपचं पुस्तक सोबत असायचं.
एक गाव पार केलं...
की गाडी थांबवायची.
मग पुस्तक उघडायचं.
'अरे... आपण आता कुठे आलो?'
मग तो मॅप उलटा...
पालटा...
पुन्हा बघायचा.
आजूबाजूच्या लोकांना विचारायचं.
आणि मग ठरवायचं...
'हो... आता आपण इथे आहोत.'"
हे सांगताना ते स्वतःच हसायला लागले.
"त्या वेळी कुठला निळा डॉट नव्हता.
कोणी बाई सांगत नव्हती...
'You are on the wrong route.'
रस्ता आम्हालाच शोधायचा असायचा.
चुकलो...
तर पुन्हा परत यायचं.
पुन्हा विचारायचं.
पुन्हा निघायचं."
क्षणभर थांबून ते म्हणाले,
"मॅप्स आले खूप नंतर.
त्याआधी ही पुस्तकंच आमचा GPS होती."
आणि मग त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली...
जी ऐकून मी अक्षरशः थक्क झालो.
"आम्ही लोकांना गिफ्ट काय द्यायचो माहितीये?"
मी मान हलवली.
"मॅपची पुस्तकं."
मी नकळत हसलो.
आज आपण एकमेकांना पॉवरबँक...
हेडफोन्स...
गॅजेट्स देतो.
आणि ते...
मॅपचं पुस्तक गिफ्ट द्यायचे.
किती वेगळा काळ होता तो.
ते बोलत होते...
आणि मी फक्त ऐकत होतो.
माझ्या डोळ्यांसमोर एकामागून एक चित्रं उभी राहत होती.
रॉकेलचा स्टोव्ह...
डोंगरावरची मॅगी...
पावसातले ट्रेक...
पानात जमा केलेलं पाणी...
उन्हात हरवलेला माणूस...
हरिहरेश्वरचा सनसेट...
आणि हातात मॅपचं पुस्तक घेऊन रस्ता शोधणारी माणसं.
हे सगळं ऐकताना मनात सतत एकच प्रश्न घोळत होता...
आपणही आपल्या पुढच्या पिढीला अशा आठवणी सांगू शकू का?
की...
आपल्या गोष्टी फक्त एवढ्याच असतील...
"तेव्हा नेटवर्क नव्हतं..."
"चार्जिंग संपली होती..."
"GPS फिरत होता..."
काका हसत म्हणाले,
"अरे...
एक शेवटचा किस्सा राहिलाय."
मीही लगेच सरळ बसलो.
कारण आता मला माहित झालं होतं...
त्यांच्या प्रत्येक "शेवटच्या" किस्स्यानंतर अजून एक भन्नाट गोष्ट नक्की असते.
"ही सांगितली नाही तर बाकी सगळ्या गोष्टी अपूर्णच राहतील."
मीही हसत म्हणालो,
"काका... आता ही पण ऐकूया."
"एकदा रात्री आम्ही सगळे नाईट रायडिंगला निघालो होतो."
ते सांगायला लागले.
"त्या वेळच्या स्कूटर्स...
बाइक्स...
जे मिळेल ते घेऊन सगळे निघालो.
रात्र होती.
रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती.
आजूबाजूला काळोख...
आणि आम्ही आपल्याच मस्तीत."
अचानक...
मध्येच एका ठिकाणी त्यांची स्कूटर बंद पडली.
"आता खरी गंमत पुढे आहे..."
ते हसत म्हणाले.
"त्या काळी मोबाईल नव्हते.
फोन करायचा प्रश्नच नव्हता.
मित्र सगळे पुढे निघून गेले होते.
आणि आम्ही...
एका काळोख्या रस्त्यावर."
ते सांगत होते...
आणि नकळत माझ्याही अंगावर काटा आला.
आजूबाजूला रान.
रात्र.
हिवाळ्याची थंडी.
आणि त्या शांततेत बंद पडलेली स्कूटर.
"त्या वेळी..."
ते म्हणाले,
"खरंच घाम फुटला होता."
मी हसत विचारलं,
"मग काय केलं?"
तेही हसले.
"अरे...
मग काय...
स्कूटरचे एकेक पार्ट उघडायला सुरुवात केली."
मग त्यांनी आणखी एक गंमत सांगितली.
"ती स्कूटर ना माझी होती...
ना माझ्या मित्राची."
मी लगेच म्हणालो,
"म्हणजे?"
"अरे...
मित्र कुणाकडून तरी स्कूटर घेऊन आला होता.
त्यामुळे आम्हा दोघांनाही तिची फारशी माहिती नव्हती."
हे ऐकून मला हसूच आलं.
अनोळखी स्कूटर...
निर्जन रस्ता...
आणि रात्रीचा काळोख.
त्यात स्कूटर बंद.
खरंच, त्या क्षणी काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करवत नव्हती.
"शेवटी म्हटलं...
चल, टूलकिट तरी बघू."
काकांनी सांगितलं.
टूलबॉक्स उघडला...
आणि तिथेच उत्तर मिळालं.
"अरे...
इथे तर एक स्विच आहे!"
स्कूटर एका मोठ्या खड्ड्यातून गेली होती.
त्या धक्क्याने टूलबॉक्स त्या स्विचवर आपटला...
आणि तो बंद झाला होता.
त्यामुळे पूर्ण स्कूटर बंद पडली होती.
"मग फक्त तो स्विच परत ऑन केला...
एक किक मारली...
आणि स्कूटर लगेच सुरू झाली."
हे सांगताना ते स्वतःच हसू लागले.
"पण लेका...
ती पाच मिनिटं...
खरंच फार डेंजर होती."
ते हसत होते...
मीही हसत होतो...
पण मनात एक वेगळाच विचार सुरू होता.
त्या काळी...
ना मोबाईल होता.
ना Google.
ना YouTube.
ना Roadside Assistance.
समस्या आली...
की उत्तरही स्वतःच शोधायचं.
बहुतेक म्हणूनच...
त्या पिढीच्या गोष्टींमध्ये साहस जास्त आहे...
आणि आपल्या गोष्टींमध्ये सोयी जास्त.
काका बोलत राहिले...
आणि मला कळलंच नाही...
कधी दोन तास निघून गेले.
एका स्टोव्हपासून सुरू झालेला विषय...
मला त्यांच्या संपूर्ण तरुणपणात फिरवून आणला होता.
आणि घरी परतताना माझ्या मनात फक्त एकच विचार होता...
कदाचित आठवणी तयार करण्यासाठी मोठे प्लॅन्स लागत नाहीत...
लागतात ते फक्त वेडे मित्र... एक डोंगर... आणि निघायची हिंमत.