All travel stories

एक रविवार... स्वतःसोबत केलेला पावसाळी प्रवास

Ek Ravivar — Pavsali Pravas · The Sunday I Rode With No DestinationMarathi / Hindi / English
Rider in a blue raincoat sitting on a rock, looking out over misty green hills near Pabe Ghat

ती अगदी अशीच एक सकाळ होती...

ऑफिसच्या सलग पाच दिवसांच्या धावपळीने अंग अक्षरशः थकून गेलं होतं. मनात एकच विचार होता...

"आज काहीच करायचं नाही... फक्त मनसोक्त झोपायचं."

सकाळी सहालाच जाग आली खरी, पण एवढ्या लवकर उठायचं तरी कशाला? म्हणून पुन्हा उशीला मिठी मारली आणि कधी इकडे, कधी तिकडे लोळत लोळत अजून दोन तास सहज निघून गेले.

शेवटी उठलो...

ब्रश केला आणि गॅलरीत आलो.

बाहेर हलका हलका पाऊस सुरू होता. गार वारा अंगाला स्पर्श करून जात होता. आभाळ पूर्ण भरून आलं होतं आणि वातावरणात एक वेगळीच शांतता होती.

अशा सकाळी घरात बसणं म्हणजे पावसाचा अपमानच.

मग सहज मित्रांना फोन करायचा विचार केला.

कोणी मित्रांसोबत फिरायला गेलं होतं... कोणी गावी गेलं होतं... कोणी ऑफिसमध्ये होतं... आणि काहींचा तर पत्ताच नव्हता.

मग स्वतःलाच म्हटलं...

"काय करायचं आता?"

क्षणाचाही विचार न करता उत्तर आलं...

"एकटाच जाऊया!"

"सोबत कुणाची मिळाली तर प्रवास सुंदर होतो... पण कधी कधी एकटेपणच, स्वतःची सर्वात सुंदर सोबत ठरतं..."

मग काय...

पटापट सगळी तयारी केली.

रेनकोट घातला...

कॅमेरा ठेवला...

हेल्मेट घेतलं...

आणि खाली आलो.

गाडीसमोर उभा राहिलो...

तेवढ्यात लक्षात आलं...

"अरे... ही तर जायच्या तयारीतच नाही!"

गेल्या पाच दिवसांच्या मुसळधार पावसाने तिची पार वाट लावली होती.

चिखल...

माती...

रस्त्यावरची डबकी...

आणि त्यातून रोज ऑफिसला ये-जा करताना तिच्यावर काय काय गेलं होतं ते फक्त तिलाच माहिती.

जरा खाली वाकून चेनकडे पाहिलं तर हलकासा लालसर रंग दिसला.

मनात आलं...

"गंजायला तर लागली नाही ना?"

मग पुन्हा वर गेलो.

चेन क्लीनिंगचं सगळं सामान आणलं आणि गाडीची सेवा सुरू झाली.

आता गंमत म्हणजे...

गेल्या काही दिवसांत कितीतरी रील्स पाहिल्या होत्या.

सगळ्यांनी अगदी एकच गोष्ट सांगितली होती.

"गाडी सुरू करून चेन साफ करू नका. हात स्प्रॉकेटमध्ये गेला तर बोटं थेट हातापासून वेगळी होतात. म्हणून नेहमी गाडी बंद करून, हाताने चाक फिरवत चेन साफ करा."

इतकं सगळं माहिती असूनही...

घाई झाली की माणूस स्वतःला जास्त शहाणा समजतो.

आणि मीही तसंच केलं.

गाडी सुरू केली.

क्लच दाबून ठेवला आणि निवांत चेन साफ करायला सुरुवात केली.

सगळं व्यवस्थित चाललं होतं.

इतक्यात एक मुलगा समोर आला.

"काका... काय करताय?"

मी सहज त्याच्याकडे पाहिलं...

आणि नकळत माझ्या हातातून क्लच किंचितसा सुटला.

पुढच्या एका सेकंदात...

घर्रररर...!!

गाडीने एकदम रेस घेतली.

चेन साफ करायचा ब्रश थेट स्प्रॉकेटमध्ये गेला.

दोन सेंटीमीटर जाड असलेला तो हाय-ग्रेड प्लास्टिकचा ब्रश...

त्याचे तुकडेही सापडले नाहीत.

क्षणभर माझ्या अंगावर काटा आला.

मनात फक्त एकच विचार चमकून गेला...

"इथे ब्रश नसता... हात असता... किंवा बोट असतं... तर?"

त्या एका क्षणाने मला दिवसभर पुरेल इतकं शहाणपण शिकवलं.

गाडी बंद केली.

दोन मिनिटं तशीच शांत उभा राहिलो.

आणि मग स्वतःशीच हसलो...

"अरे वेड्या... दुसऱ्यांना सांगितलेले नियम स्वतःसाठीही असतात."

"अपघात नेहमी होत नाहीत... कधी कधी ते फक्त दार ठोठावून जातात, आणि सांगून जातात... 'पुढच्या वेळी जपून...'"

मग व्यवस्थित हाताने चाक फिरवत चेन साफ केली.

ल्युब्रिकेशन केलं.

गाडी पुन्हा चमकायला लागली.

आता वाटलं...

"चल... आता तयार आहोत."

आजची सोबत आधीच ठरली होती.

GoPro...

Selfie Stick...

आणि...

एक छोटासा थर्मस.

मनात एकच प्लॅन होता.

"आजचा चहा... डोंगरावर बसून प्यायचा."

मग गाडी थेट शिवारशकडे वळवली.

तिथे गरमागरम चहा भरून घेतला.

थर्मस ठेवला.

हेल्मेट घातलं.

GoPro सुरू केला.

आणि Honda ने पहिला गिअर टाकत दिवसाच्या प्रवासाची सुरुवात केली.

कानात रोमँटिक गाणी सुरू होती.

पावसाच्या सरी अधूनमधून चेहऱ्यावर येऊन पडत होत्या.

रस्त्यावर नेहमीप्रमाणे पुण्याचं ट्रॅफिक होतंच.

सिग्नल...

गाड्या...

हॉर्न...

आणि त्यातून वाट काढत काढत शेवटी पोहोचलो...

खडकवासला.

धरणातून आज पाणी सोडलं होतं.

दूरवरूनच त्याचा आवाज ऐकू येत होता.

गाडी बाजूला लावली.

आणि काही क्षण फक्त तसाच उभा राहिलो.

समोरून प्रचंड वेगाने कोसळणारं पाणी...

त्याचा कानात घुमणारा आवाज...

आणि त्यातून उडणारे पांढरे शुभ्र तुषार...

जणू निसर्ग स्वतःची ताकद दाखवत होता.

आजूबाजूला बरीच गर्दी होती.

कोणी फोटो काढत होतं...

कोणी रील्स बनवत होतं...

कोणी फक्त त्या पाण्याकडे एकटक बघत उभं होतं.

कदाचित...

कोणीतरी कोणाची आठवण काढत असेल...

कोणीतरी स्वतःलाच शोधत असेल...

आणि काही जण फक्त तो क्षण जगत असतील.

मीही GoPro आणि फोन काढला.

दोन-चार व्हिडिओ घेतले.

पण आजही आठवतं ते व्हिडिओ नाही...

आठवतं ते समोरून धावून येणारं पाणी...

त्याचा अंगावर येणारा गडगडाट...

आणि मनाला क्षणभर पूर्ण शांत करून टाकणारा तो देखावा.

त्या क्षणी नकळत मनात चार ओळी उमटल्या...

"धुक्याच्या त्या पांढऱ्या पडद्याआड, डोंगर आज हसत होता... पावसाच्या प्रत्येक थेंबामधून, निसर्ग मनाशी बोलत होता..."

काही क्षण तिथेच थांबलो.

हेल्मेट पुन्हा घातलं.

इंजिन सुरू केलं.

आणि गाडी आता वळली...

पाबे... आणि तोरणाच्या दिशेने...

हा रस्ता माझ्यासाठी काही नवीन नव्हता.

कितीतरी वेळा या रस्त्यावरून आलो होतो.

पण प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता वेगळाच दिसतो.

इथे एक जागा आहे...

जिथे उभं राहिलं की जवळपास दोनशे सत्तर अंशात फक्त डोंगरच डोंगर दिसतात.

आजचा चहा तिथेच प्यायचा...

हा विचार मनात ठेवून मी निवांत गाडी चालवत होतो.

Honda तिच्या लयीत धावत होती.

कानात गाणी होती.

मन पूर्ण शांत होतं.

आणि समोर...

ढगांमध्ये हरवलेले सह्याद्री मला हळूहळू जवळ बोलावत होते...

...आणि समोर सुरू झाला पाबे घाट.

पावसाळ्यात घाट चढण्याची मजाच काही वेगळी असते. प्रत्येक वळणानंतर एखादा नवा देखावा समोर उभा राहतो. कुठे ढग रस्त्यालाच मिठी मारून उभे, तर कुठे हिरव्या गालिच्यावरून अलगद झेपावणारे छोटे छोटे धबधबे.

लोक म्हणतात, स्वतःच्या गाडीचं फार कौतुक करू नये...

पण त्या दिवशी माझ्या Honda ने जे दाखवलं, त्याचं कौतुक करावंच लागेल.

तो उबडधोबड रस्ता, मधेमधे पडलेले खड्डे, चिखल, पावसाने वाहून आलेली माती... पण ती इतक्या अलगदपणे घाट चढत होती की वर बसलेल्या मला एकही मोठा धक्का जाणवत नव्हता. जणू तिलाही माहिती होतं की आज आपण कुठे पोहोचायची घाई करायची नाही... फक्त प्रवास जगायचा आहे.

मी निवांत आजूबाजूचं सौंदर्य पाहत होतो आणि अचानक रस्त्याच्या कडेला एक जागा नजरेत भरली.

"बस्स... इथे फोटो काढूया."

गाडी बाजूला लावली.

हेल्मेट काढलं.

बॅग उघडली.

आणि मोठ्या थाटात Selfie Stick बाहेर काढली.

आता पुढचं दृश्य पाहिलं असतं तर कुणीही हसलं असतं.

कधी दगडावर ठेवतोय...

कधी मातीत खोचतोय...

कधी कोन बदलतोय...

कधी मोबाईल सरळ करतोय...

आणि ती बया काही केल्या उभीच राहायला तयार नाही!

दहा मिनिटं...

पंधरा मिनिटं...

मी आणि ती Selfie Stick दोघंच झुंजत होतो.

आजूबाजूला दूरवर माणूसही दिसत नव्हता की कोणाला म्हणावं, "भाऊ, एक फोटो काढून द्या."

शेवटी मीच हार मानली.

मनात म्हटलं,

"राहू दे... फोटो पुन्हा कधीही काढता येतील."

गाडी सुरू केली आणि पुढे निघालो.

"काही क्षण कॅमेऱ्यात कैद होत नाहीत, ते मनातच जपावे लागतात... कारण फोटो आठवण दाखवतो, पण आठवण तो क्षण पुन्हा जगवते."

थोडं पुढे गेलो आणि पुन्हा एक जागा नजरेत भरली.

पाबे घाट उतरल्यावर बाजूला एक छोटासा चढ आहे. तिथे दोन झाडं उभी होती. त्यांच्या मधून दिसणारा डोंगरांचा नजारा इतका सुंदर होता की यावेळी फोटो न काढणं म्हणजे पापच झालं असतं.

पुन्हा गाडी बाजूला.

पुन्हा Selfie Stick.

पुन्हा तिच्यासोबतची कुस्ती.

पण यावेळी नशीब साथ देत होतं.

जवळपास पंधरा मिनिटं सेटिंग केल्यानंतर शेवटी ती व्यवस्थित उभी राहिली.

मी पटकन दोन फोटो काढले.

आणि मनात एक छोटासा विजय साजरा केला.

"चल... एवढी मेहनत वाया गेली नाही."

पाबे घाटातला तो फोटो — पंधरा मिनिटांच्या कुस्तीनंतर शेवटी Selfie Stick ने ऐकलं.
पाबे घाटातला तो फोटो — पंधरा मिनिटांच्या कुस्तीनंतर शेवटी Selfie Stick ने ऐकलं.

इतक्या वेळ उभं राहून जरा दमलोही होतो.

मग थर्मस बाहेर काढला.

झाकणात चहा ओतला.

समोर धुक्याने अर्धे लपलेले डोंगर...

चेहऱ्यावर अलगद स्पर्श करून जाणारा वारा...

आणि हातात गरमागरम चहा...

त्या क्षणी खरंच दुसरं काहीच नको होतं.

पहिला घोट घेतला...

आणि नकळत मनात चार ओळी उमटल्या...

"थर्मसमधला चहा गरम होता, डोंगरांवर धुक्याचा शालू होता. प्रवास माझा एकट्याचा असला, तरी प्रत्येक वळणावर निसर्ग सोबतीला होता."

थोडावेळ तसाच बसलो.

वाऱ्याचा आवाज ऐकत.

समोरचं दृश्य डोळ्यांत साठवत.

आणि मग पुन्हा प्रवास सुरू केला.

आता पुढचा टप्पा होता...

भट्टी घाट.

साधारण दहा किलोमीटर पुढे गेल्यावर भट्टी घाट सुरू होतो.

पूर्वी हा घाट म्हणजे थोडासा धडकी भरवणारा. रस्ता अरुंद, उखडलेला आणि पावसाळ्यात तर आणखीच अवघड.

पण यावेळी चित्र वेगळंच होतं.

जणू नुकतंच नवीन काम झालं होतं.

रस्ता अगदी मऊसूत झाला होता.

भट्टी घाट सुरू होण्याआधीचा नवा कोरा, ओलाचिंब रस्ता — आणि दूर वळणावर हरवलेला अजून एक प्रवासी.
भट्टी घाट सुरू होण्याआधीचा नवा कोरा, ओलाचिंब रस्ता — आणि दूर वळणावर हरवलेला अजून एक प्रवासी.

गाडी निवांत घाट चढू लागली.

घाट सुरू होण्याआधीच एक धबधबा लागतो.

तो दिसताच मी गाडी बाजूला घेतली.

तिथे आधीच बरीच गर्दी होती.

कोणी फोटो काढत होतं.

कोणी रील्स बनवत होतं.

आणि काही अतिउत्साही मंडळी तर पूर्ण कुटुंबासकट धबधब्याखाली उतरली होती.

मी निवांत उभा राहून ते सगळं पाहत होतो.

तेवढ्यात...

एका काकांचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला.

लहान मुलगा रडायला लागला.

काकू घाबरत घाबरत त्याला धरून बाहेर काढत होत्या.

बहुतेक नुकत्याच घसरल्या असाव्यात.

पाच-दहा मिनिटं त्यांचाच गोंधळ सुरू होता.

आणि मी मनात म्हणत होतो...

"देवा, एकदा तरी बाजूला व्हा. धबधब्याचा एक व्हिडिओ तरी घेऊ दे."

शेवटी ती मंडळी निघून गेली.

मी मोबाईल काढणार इतक्यात...

दोन मुली थेट धबधब्याखाली जाऊन उभ्या राहिल्या.

क्षणभर हसू आलं.

आज बहुतेक धबधबा माझ्यासाठी रिकामा दिसणारच नव्हता.

मग म्हटलं,

"जाऊ दे... धबधबा महत्त्वाचा."

त्यांच्यासोबतच त्या धबधब्याचे फोटो आणि व्हिडिओ घेतले.

कधी कधी एखाद्या जागेची आठवण तिथल्या माणसांमुळेही राहते.

हा धबधबाही आता तसाच लक्षात राहणार होता.

आता वाट होती...

मढे घाटाची.

मनात आधीच कितीतरी दृश्यं रंगवली होती.

पण निसर्गाचे प्लॅन वेगळेच असतात.

फार्महाऊसच्या थोडंसं आधीच एक पोलीस काका उभे होते.

त्यांनी हात करून मला थांबवलं.

"साहेब, पुढे जाऊ नका."

"का हो?"

"पुढे रस्ता खचला आहे. माघारी फिरा."

क्षणभर निराशा झाली.

मढे घाट राहणार होता.

पण लगेच आठवलं...

"अरे! आपल्या काकांचं फार्महाऊस तर इथेच आहे."

मी त्यांना तसं सांगितलं.

त्यांनी हसत मान डोलावली.

"जा... पण पुढे घाटाच्या दिशेने जाऊ नका."

मीही "हो" म्हणत गाडी फार्महाऊसच्या दिशेने वळवली.

हॉर्न वाजवत आत शिरलो.

आणि मला पाहताच घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद उमटला...

तो अजूनही डोळ्यासमोर तसाच उभा राहतो.

अचानक भेटण्यातली मजाच वेगळी असते.

गाडी लावली.

रेनकोट काढला.

हेल्मेट बाजूला ठेवलं.

आणि थेट घरात गेलो.

मावशीने विचारपूस केली आणि काही मिनिटांतच माझ्यासमोर गरमागरम जेवण आलं.

पोळी...

भेंडीची भाजी...

आणि गोड शिक्रण.

त्या क्षणी बाहेर कितीही सुंदर दृश्य असलं तरी...

घरच्या जेवणाचा सुगंधच सगळ्यात सुंदर वाटत होता.

पोटभर जेवलो.

थोडा वेळ गप्पा मारल्या.

फार्महाऊसची एक रील केली.

बाजूलाच वाहणाऱ्या त्या छोट्याशा नदीला भेट दिली.

आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली होती...

...पण अजूनही त्या दिवसाने मला किती आठवणी द्यायच्या बाकी होत्या, याची कल्पनाही नव्हती.

बॅग पुन्हा खांद्यावर घेतली.

गाडी सुरू केली आणि फार्महाऊसचा निरोप घेत पुढच्या रस्त्याला लागलो.

पाऊस अजूनही अधूनमधून बरसत होता. रस्त्यावरून उठणारा ओल्या मातीचा सुगंध, डोंगरांवरून अलगद खाली उतरणारे ढग आणि त्या सगळ्यातून निवांत पुढे सरकणारी माझी Honda...

घाई आता कुठेच नव्हती.

दिवसभरात जेवढं पाहिलं होतं, ते मनात पुन्हा पुन्हा फिरत होतं.

परतीच्या वाटेवर पुन्हा एक सुंदर जागा दिसली.

रस्त्याच्या कडेला बरीच मंडळी थांबली होती.

कोणी नाचत होतं...

कोणी फोटो काढत होतं...

नेहमीप्रमाणे रील्स बनवणारे कलाकार त्यांच्या दुनियेत व्यस्त होते...

तर दोन-चार कपल्स शांतपणे डोंगरांकडे पाहत बसली होती.

मीही गाडी बाजूला लावली.

पण गर्दीत जाऊन उभं राहण्यापेक्षा थोडंसं दूर एक निवांत ठिकाण निवडलं.

थर्मस उघडला.

उरलेला चहा झाकणात ओतला.

पहिला घोट घेतला...

आणि समोर वाहणाऱ्या वाऱ्याशी गप्पा सुरू झाल्या.

तिथे बोलायला कोणी नव्हतं...

पण तरीही खूप काही बोलून झाल्यासारखं वाटत होतं.

त्या शांततेला शब्दांची गरजच नव्हती.

त्या क्षणी मनात नकळत ओळी उमटल्या...

"वारा काही बोलत नव्हता, तरी सगळं सांगून गेला... एकटेपणा काही टोचत नव्हता, उलट स्वतःशीच भेट घडवून गेला..."

काही क्षण तिथेच बसलो.

डोंगरांकडे पाहत...

शेवटच्या चहासोबतची सोबत — ढगांनी अर्धा गिळलेला डोंगर.
शेवटच्या चहासोबतची सोबत — ढगांनी अर्धा गिळलेला डोंगर.

चहाचा शेवटचा घोट घेतला...

आणि मग परतीचा प्रवास खराखुरा सुरू केला.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाने फुलवलेली रानफुलं दिसू लागली.

लाल...

पिवळी...

जांभळी...

पांढरी...

जणू निसर्गाने स्वतःचं छोटंसं प्रदर्शन भरवलं होतं.

तेवढ्यात आठवलं...

आत्या कित्येक दिवसांपासून म्हणत होती,

"शेतावर जाऊ कधीतरी."

आणि शेवटी तिला सोडून मी एकटाच शेतावर, म्हणजे फार्महाऊसवर, जाऊन आलो.

मग म्हटलं...

"चल, आज निदान रिकाम्या हाताने तरी जाऊ नको."

रस्त्याच्या कडेला थांबलो.

काही रानफुलं अलगद तोडली.

मनातल्या मनात हसलो.

"आता ही फुलं पाहून कदाचित मार कमी बसेल."

ती फुलं गाडीला लावली आणि पुन्हा गाडी पुढे निघाली.

आत्यासाठी तोडलेली रानफुलं — हँडलबारवर विराजमान.
आत्यासाठी तोडलेली रानफुलं — हँडलबारवर विराजमान.

आता वाट होती...

खडकवासल्याची.

आणि तिथे पोहोचल्यावर कळलं...

आजचा शेवट इतक्या शांतपणे होणार नव्हता.

समोर जिकडे पाहावं तिकडे गाड्याच गाड्या.

प्रचंड ट्रॅफिक.

हळूहळू पुढे सरकणारी वाहनांची रांग.

मीही त्यातल्या त्यात वाट काढत पुढे चाललो होतो.

इतक्यात मागून एक PMPML बस आली.

आता पुण्यातल्या बसचालकांचा परिचय वेगळा करून द्यायची गरज नाही.

त्या पट्ठ्याने काहीही विचार न करता थेट बस पुढे घातली.

क्षणात तीन-चार दुचाकी बाजूला दाबल्या गेल्या.

दोन-तीन गाड्यांना धक्का लागला.

माझी गाडीही शेजारच्या गाडीत दाबली गेली.

त्या सगळ्या गोंधळात माझे हेडफोन कानातून निसटले.

सरळ चिखलात पडले.

आणि त्यांच्या आयुष्याचा शेवट तिथेच झाला.

मी स्वतःशीच हसलो.

"सकाळी ब्रश गेला... आता हेडफोन गेले... आजचा दिवस खरंच काहीतरी घेऊनच जाणार होता."

जवळपास एक तास त्या ट्रॅफिकशी झुंज देत देत शेवटी त्यातून बाहेर पडलो.

घरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ५:४० वाजले होते.

सकाळी १०:३० ला सुरू झालेला हा प्रवास आता संपला होता.

गाडी स्टँडवर लावली.

आणि काही क्षण तिच्याकडेच पाहत उभा राहिलो.

दिवसभर तिनेच साथ दिली होती.

घरात जाताना सहज मागे वळून पाहिलं.

गाडीवर अजूनही पावसाचे काही थेंब चमकत होते.

दिवसभराचा थकवा होता...

पण मन मात्र विलक्षण शांत होतं.

त्या एका दिवसाने खूप काही शिकवलं.

कधी कधी कुणी सोबत असणं गरजेचं नसतं.

कधी कधी फक्त निघणं महत्त्वाचं असतं.

रस्ता स्वतःच माणसाला त्याच्याशी भेट घडवतो.

आणि त्या दिवशी मला भेटले...

पाऊस...

डोंगर...

चहा...

रस्ते...

आणि सगळ्यात महत्त्वाचं...

मी स्वतः.

शेवटी मनात एकच विचार आला...

"प्रवास डोंगरांचा नव्हता, प्रवास मनाचा होता. सोबत कुणी नव्हतं, म्हणूनच कदाचित स्वतःला भेटणं शक्य झालं होतं."

त्या दिवसानंतर एक गोष्ट मात्र नक्की ठरली...

कधी कधी खरंच निघून जावं...

कुणी असो किंवा नसो...

आपण आपल्या सोबत फिरायला.