All travel stories

घाटेश्वर शिव मंदिर – प्लॅनपेक्षा जास्त आठवणीत राहिलेला प्रवास!

Ghateshwar Shiv Mandir · The Trip That Was Never Supposed to Go This Way...Marathi / Hindi / English
Stone Nandi facing the small Ghateshwar Shiv temple, surrounded by tall trees

तर झालं असं की, मागच्या ट्रिपनंतर बरीच मित्रमंडळी माझ्या मागे लागली होती. प्रत्येकाचं एकच म्हणणं...

"तू एकटाच एकटाच फिरतो... आम्हाला कधी नेत नाही!"

खरं सांगायचं तर त्यांचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं. मग यावेळी ठरवलं, चला... या वेळी सगळ्यांना सोबत घेऊनच जाऊ.

पण आता प्रश्न होता... जायचं कुठे?

गोड गोंधळ सुरू झाला. प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळ्या जागा होत्या. त्यात एका मैत्रिणीने विषय काढला,

"मला एखादा मस्त वॉटरफॉल बघायचा आहे... आपण मढेघाटला जाऊयात."

मढेघाट ऐकताच मागच्या आठवड्यातलं सगळं डोळ्यासमोर आलं. तिकडे जाताना मध्येच पोलिसांनी अडवलं होतं, त्यात रस्ताही खचला होता. त्यामुळे तिच्याकडे बघून शांतपणे म्हटलं,

"तिकडे जाणं आता शक्य नाही. रस्ताच खचला आहे. दुसरीकडे जाऊया."

मग काय... पुढचा अर्धा तास एकमेकांना रील्स पाठवण्यातच गेला. कुणी एक जागा पाठवत होतं, तर कुणी दुसरी. शेवटी सगळ्यांना एक जागा पटली...

घाटेश्वर शिव मंदिर.

जागा ठरली खरी, पण नेहमीप्रमाणे मी कुणालाच आपण नेमकं कुठे जाणार आहोत हे सांगितलं नाही. काय करणार आहोत हे तर अजिबातच नाही. कारण मला स्वतःलाच अशा ट्रिपमध्ये थोडा Surprise ठेवायला आवडतो.

सुरुवातीला पाच जण येणार होते. मग एकाने काढता पाय घेतला, दुसऱ्याचं काहीतरी काम निघालं... आणि शेवटी आकडा येऊन थांबला...

तीन!

म्हटलं...

"ये भी ठीक है."

पण या ट्रिपसाठी माझ्या डोक्यात आधीपासूनच एक प्लॅन शिजत होता.

खूप दिवसांपासून शेतात जाऊन मस्त चुलीवर नाही, पण छोट्या गॅसवर गरमागरम मॅगी आणि चहा बनवायची इच्छा होती. ट्रेकिंगचा गॅस काही येत नव्हता, म्हणून शेवटी मित्राकडून एक दिवस आधीच गॅस उधार आणला. शुक्रवारी रात्री सगळ्यांना मेसेज केला,

"उद्या सकाळी नऊ वाजता तयार राहा."

मनात मात्र वेगळाच उत्साह होता. कारण ही फक्त Bike Ride नव्हती... आज मॅगी आणि चहाचा कार्यक्रमही होता.

सकाळ झाली.

अलार्मने काय काम केलं होतं माहित नाही, पण बरोबर ९:१० ला मैत्रिणीचा फोन आला आणि तेव्हाच माझे डोळे उघडले.

मी अजून बेडवरच!

ताडकन उठलो. फोन उचलून म्हटलं,

"अगं... ९:३० ला निघू."

फोन ठेवला आणि मग सुरू झाली खरी धावपळ.

पटापट आवरलं. बॅगमध्ये सुरी, दूध आणि बाकीचं सामान टाकलं. ९:३० पर्यंत तयार होऊन बसलो, तोच तिचा मेसेज आला...

"अजून वेळ आहे... दहा मिनिटांनी ये."

म्हटलं, चालेल.

तिला Pick करायला गेलो आणि तिथे पहिलाच धक्का बसला.

आमच्यातली एक गडी आधीच कोसळली होती.

एक जण ऑफिसला जाणार होता.

मग उरलो आम्ही तिघेच.

म्हटलं...

"चल... तिघेच जाऊ. मजा कमी होणार नाही."

आता तिसऱ्या गडीला घ्यायला निघालो आणि अचानक माझ्या डोक्यात एकदम लाईट लागली.

अरे... GoPro चा Screw!

GoPro आणला होता.

Holder आणला होता.

पण Screw मात्र रूमवरच राहिला होता.

क्षणाचाही विचार न करता परत रूमकडे धूम ठोकली. धावत जाऊन Screw आणला आणि परत आलो.

मला वाटलं आता सगळं झालं.

पण नाही.

गाडी सुरू करण्याआधीच पुन्हा आठवलं...

अरे... आज मॅगी बनवायची आहे.

मग भांडी कुठे आहेत?

सांडशी?

ग्लास?

चहाचं भांडं?

बस्स...

पुन्हा Checklist सुरू.

तीन वेळा वर-खाली करत सगळी भांडी, ग्लास, सांडशी, बाकीचं सामान जमा केलं. एवढी धावपळ झाल्यावर शेवटी पोहे आणि उपमा खाल्ले आणि मग खरंच ट्रिपला सुरुवात झाली.

त्या सकाळचं वातावरण मात्र अफलातून होतं.

आठवडाभर मुसळधार पाऊस पडून गेला होता, पण आज नेमका पाऊस गायब होता. फार ऊनही नव्हतं. मध्येच हलकासा सूर्यप्रकाश, मध्येच रिमझिम पाऊस... हवेत एक वेगळाच गारवा होता.

कानात Headphones टाकले...

बाईक सुरू केली...

आणि आम्ही तिघे निघालो.

लोकेशन शेअर केलं.

६५ किलोमीटर.

त्यातले जवळपास चाळीस किलोमीटर तर हायवेवरूनच जाणार होते.

गाणी ऐकत ऐकत, गप्पा मारत मारत आम्ही रावेत पार केलं, तळेगाव मागे टाकलं आणि शेवटी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला वळलो.

पण गाडी वळवली आणि लगेच एक काका धावत आमच्याकडे आले.

"अहो... तिकडे जाऊ नका. रस्ता बंद आहे."

आता Google Maps ला हे कसं समजावणार?

म्हटलं...

"थोडं पुढे जाऊ. आपोआप Reroute करेल."

पुन्हा हायवेवर आलो. थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे दुसरा रस्ता दिसला. Maps नेही तोच दाखवला, म्हणून आम्ही तिकडे वळलो.

मनात अपेक्षा होत्या...

आता पुढे डोंगर सुरू होतील...

धबधबे दिसायला लागतील...

पण जसजसं पुढे जाऊ लागलो, तसतसं चित्र उलटंच दिसायला लागलं.

रस्ता खराब होत गेला.

आणि दोन्ही बाजूला फक्त ट्रक्स.

बराच वेळ असंच चाललं.

शेवटी एका ठिकाणी नदी दिसली.

गाडी बाजूला लावली.

हातात पेरू घेतला.

नदीकाठचा पहिला थांबा — इथेच सुरू झाली "अजून किती आहे?" ची मीटिंग.
नदीकाठचा पहिला थांबा — इथेच सुरू झाली "अजून किती आहे?" ची मीटिंग.

आणि सुरू झाली पुढची मीटिंग...

"अजून किती आहे?"

"लोकेशन किती दूर आहे?"

Maps वर पाहिलं तर अजून दहा किलोमीटरच उरले होते. पण तेवढ्यात बाजूलाच एक छोटासा रस्ता दिसला.

आणि नेहमीप्रमाणे...

शहाणपणा सुरू झाला.

"अरे हा रस्ता बघ किती मस्त दिसतोय... चल ना इकडून जाऊ."

कुठलाही विचार न करता आम्ही मुख्य रस्ता सोडला आणि त्या वाटेने आत शिरलो.

"हा रस्ता बघ किती मस्त दिसतोय..." — तोच तो रस्ता, ज्याने आम्हाला पाच किलोमीटर फिरवून आणलं.
"हा रस्ता बघ किती मस्त दिसतोय..." — तोच तो रस्ता, ज्याने आम्हाला पाच किलोमीटर फिरवून आणलं.

आज विचार केला तर वाटतं...

त्या दिवशी आमचा Compass नाही, तर Curiosity चालवत होती.

तो रस्ता किती "मस्त" दिसत होता हे खरं... पण पुढे काय आहे याची मात्र आम्हा तिघांनाही काहीच कल्पना नव्हती. खरं तर आम्हाला तशी गरजही वाटली नाही. त्या क्षणी आमचं एकच धोरण होतं...

"रस्ता छान दिसतोय ना? मग जाऊया!"

असं करत करत जवळपास पाच किलोमीटर आत शिरलो आणि समोर एक काका दिसले. आमच्या गडीने लगेच गाडी थांबवली आणि मराठीत विचारलं,

"काका, पुढे काय आहे?"

काकांनी आमच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले,

"हिंदी में बात करो... मराठी समझता नहीं."

आता आमचं मराठी अचानक हिंदीमध्ये बदललं.

"आगे क्या है?"

काका पुन्हा म्हणाले,

"तुमको किधर जाना है? आगे कुछ नहीं है."

त्यांचं उत्तर ऐकून आम्ही एकमेकांकडे बघत उभे. शेवटी मीच खाली उतरलो आणि हसत हसत त्यांना म्हटलं,

"काका, यांना कुठे जायचं नाहीये... हे फिरायलाच निघालेत. बस भटकायचं आहे."

काका फक्त हसले.

तेवढ्यात आमच्या तिसऱ्या गडीचं लक्ष लांब दिसणाऱ्या पवनचक्कीकडे गेलं.

"चल... तिकडे जाऊया!"

आम्ही जवळजवळ तिकडे निघणारच होतो, तेवढ्यात समोरून एक गाडी आली. त्यातला माणूस मराठी बोलताना ऐकला आणि मनात म्हटलं...

"चल, आता आपला माणूस भेटला."

मी त्यालाच थांबवलं.

"दादा, पुढे नक्की काय आहे?"

तो म्हणाला,

"पुढे काहीच नाही. पवनचक्की दिसतेय खरी, पण ती खूप लांब आहे. तुम्ही मागे फिरा आणि डावीकडचा रस्ता घ्या. सगळी मंडळी फिरायला तिकडेच जातात."

हे ऐकताच आम्ही तिघेही एकमेकांकडे बघून हसायला लागलो.

कारण तो डावीकडचा रस्ता म्हणजे...

आपण स्वतःच्या शहाणपणामुळे सोडून आलेला मूळ रस्ताच होता!

मग काय...

गाडी वळवली आणि परत Main Road वर आलो.

पण खरं सांगायचं तर, त्या चुकीच्या वळणाचाही काही राग आला नाही. कारण त्या दिवशी आम्ही Destination शोधत नव्हतो...

रस्ता शोधत होतो.

जवळपास पाच किलोमीटर पुढे आलो आणि अचानक सगळंच बदललं.

आतापर्यंत ट्रक्स आणि धुळीने भरलेला रस्ता एका क्षणात जणू हिरव्या स्वर्गात बदलला.

जिकडे नजर जाईल तिकडे डोंगर...

डोंगरांवर पसरलेली गर्द हिरवाई...

मधूनच पांढऱ्या रेषांसारखे कोसळणारे धबधबे...

आणि त्या सगळ्यातून वळणं घेत जाणारा नागमोडी रस्ता.

आमच्या बाईकचा Speedometer कमी झाला...

पण चेहऱ्यावरचा उत्साह मात्र दुप्पट झाला.

आता दर पाच-दहा मिनिटांनी गाडी थांबू लागली.

कधी एखाद्या View Point वर...

कधी एखाद्या धबधब्यासमोर...

कधी फक्त एखादं सुंदर वळण दिसलं म्हणून.

फोटो...

व्हिडिओ...

रील्स...

सगळंच सुरू होतं.

एका ठिकाणी तर आम्हाला मोठमोठी हिरवी पानं दिसली.

कोणीतरी म्हणालं,

"अरे... ही चेहऱ्यावर धरून Reel बनवूया."

मग काय...

क्षणात पानं तोडली गेली आणि Reel चं शूटिंगही सुरू झालं.

हिरवाई सुरू झाली आणि पहिला फोटोसेशनही.
हिरवाई सुरू झाली आणि पहिला फोटोसेशनही.

थोडं पुढे गेल्यावर एक धबधबा दिसला.

दूरून मस्त वाटत होता.

"चल... हा जवळून बघू."

गाडी बाजूला लावली आणि पाच मिनिटांचा छोटासा Trek करून आत गेलो.

पण जवळ गेल्यावर वाटलं...

"अरे... फोटोमध्ये जितका भारी दिसतोय तितका प्रत्यक्षात नाही."

मग दोन फोटो काढले, दोन मिनिटं तिथे थांबलो आणि पुन्हा पुढे निघालो.

धबधबा जवळून तितका भारी नव्हता... पण फोटो मात्र झालाच.
धबधबा जवळून तितका भारी नव्हता... पण फोटो मात्र झालाच.

पण आमच्यातला एक मात्र या सगळ्यापेक्षा वेगळ्याच Mission वर होता.

त्याला दर पाच मिनिटांनी भूक लागत होती.

शेवटी त्याच्या भुकेपुढे आम्हीही हार मानली आणि रस्त्यात दिसलेल्या एका ढाब्यावर गाडी थांबवली.

गरमागरम कांदा भजी मागवल्या.

सोबत दोन बिसलेरीच्या बाटल्या घेतल्या.

पावसाळी थंडीत गरमागरम कांदा भजी — ढाब्यावरचा सर्वात योग्य निर्णय.
पावसाळी थंडीत गरमागरम कांदा भजी — ढाब्यावरचा सर्वात योग्य निर्णय.

पावसाळ्यातल्या त्या थंड हवेत गरम भजी खाण्याची मजाच काही वेगळी होती.

थोडा वेळ तिथे निवांत बसलो आणि पुन्हा प्रवास सुरू केला.

पुढे जे दृश्य दिसलं, ते मात्र आजही डोळ्यासमोर तसंच उभं राहतं.

रील्समध्ये अनेकदा पाहिलेला तो रस्ता...

पण प्रत्यक्षात तो कितीतरी पटीने सुंदर होता.

एका बाजूला उंच डोंगर...

दुसऱ्या बाजूला शांत पाण्याचं तळं...

डोंगरावरून वाहत येणारे असंख्य धबधबे...

मध्ये मध्ये पसरलेली भातशेती...

आणि त्या सगळ्यातून वळणं घेत पुढे जाणारा रस्ता.

एका बाजूला भातशेती, समोर डोंगरावरून कोसळणारे धबधबे.
एका बाजूला भातशेती, समोर डोंगरावरून कोसळणारे धबधबे.

असं वाटत होतं, आपण रस्ता पार करत नाहीये...

रस्ता आपल्याला निसर्ग दाखवत पुढे घेऊन चाललाय.

परिणाम एकच...

प्रत्येक पाचशे मीटरला आमची गाडी थांबत होती.

"इथे एक फोटो."

"अरे थांब... इथून व्हिडिओ घे."

"अरे हा Angle भारी आहे."

असं करत करत वेळ कसा गेला ते कळलंच नाही.

आणि या सगळ्या फोटो-व्हिडिओंच्या गोंधळात शेवटी आम्ही आमच्या Destination ला पोहोचलो...

घाटेश्वर शिव मंदिर.

मंदिरात पोहोचताच सगळ्यांनी आधी आपापलं सामान खाली ठेवलं. पण आमच्या एका गडीला तेवढ्यातच Vlog शूट करायची हुक्की आली.

GoPro हातात घेतला आणि Madam सरळ Host बनल्या.

कधी एखाद्या लहान मुलाला थांबवून त्याच्याशी गप्पा, तर कधी समोरून येणाऱ्या ग्रुपचा जवळजवळ Interview घेत घेत आम्ही मंदिराकडे निघालो. मीही विचार केला, गर्दी वाढायच्या आत माझी Reel उरकून घ्यावी. पटकन एक Reel शूट केली आणि मग सगळे मिळून मंदिरात प्रवेश केला.

मंदिरात पाऊल टाकताच पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे तिथली शांतता.

चहूबाजूंनी उंच हिरवीगार झाडी. इतकी दाट की क्षणभर वाटावं आपण मंदिरात नाही, तर एखाद्या जंगलाच्या मध्यभागी आलोय. त्या हिरवाईत अगदी शांतपणे उभं असलेलं ते छोटंसं मंदिर वेगळंच सुंदर दिसत होतं.

मंदिर नाही, जंगलच वाटावं अशी शांतता.
मंदिर नाही, जंगलच वाटावं अशी शांतता.

मंदिराच्या मागे नदी होती. तिकडे जायची खूप इच्छा होती, पण कुणीतरी रस्ता बंद करून ठेवला होता. त्यामुळे तिकडे जाणं शक्यच नव्हतं.

मग आम्ही मंदिराभोवती फिरत, फोटो आणि व्हिडिओ काढत होतो. तेवढ्यात आमचं लक्ष एका मुलीकडे गेलं.

पांढरी साडी...

ब्लाऊजच्या उजव्या हातावर त्रिशूळ...

आणि समोर सुरू होतं तिचं Reel Shoot.

काय चाललं होतं ते पाहून आम्ही काही वेळ तिथेच उभे राहिलो. पूर्ण Comedy Show सुरू होता. कोणाचा Pose चुकत होता, कोणाचं Timing चुकत होतं... पुन्हा Retake... पुन्हा Action...

थोडा वेळ ते सगळं पाहिलं आणि मग म्हटलं,

"चल... आधी दर्शन घेऊ."

आमच्या Madam कॅमेरा घेऊन मंदिरात शिरल्या आणि तेवढ्यात भटजी बाबा जोरात ओरडायला लागले.

सुरुवातीला आम्हाला काही कळलंच नाही. पण नंतर एका दादाने सांगितलं,

"कॅमेरा दिसला की पैसे मागतात... म्हणून ओरडतायत."

पण तोपर्यंत माझं डोकं आधीच फिरायला लागलं होतं.

"हे काय आत नेलंय? चल... बाहेर निघा लगेच!"

हे शब्द ऐकले आणि मीही शांत बसलो नाही.

"अहो... ओरडू नका. मंदिरात आहोत म्हणून... नाहीतर. जरा अति होतंय तुमचं."

एवढंच बोललो.

दर्शन घेतलं आणि जास्त वाद न घालता बाहेर पडलो.

थोडा वेळ अजून मंदिर परिसरात फोटो आणि व्हिडिओ काढले. पण आता पुढचा कार्यक्रम सुरू करण्याची वेळ झाली होती.

आणि तो म्हणजे...

मॅगी!

मंदिरापासून थोडं पुढे गेल्यावर आम्ही एक छानशी जागा शोधली. आजूबाजूला भातशेती, गार वारा आणि मस्त वातावरण.

बस्स... यापेक्षा अजून काय हवं?

क्षणात आमचा सगळा संसार बाहेर आला.

भांडी...

प्लेट्स...

गॅस...

बाकीचं सामान...

आमच्या गडींनी आधी भांडी धुवून आणली. तोपर्यंत मी गॅस लावून पाणी उकळायला ठेवलं.

पाणी तापत असताना कांदा, टोमॅटो, गाजर आणि बाकीच्या भाज्या पटापट चिरून घेतल्या.

पाणी उकळायला लागलं तसं सगळ्या भाज्या त्यात टाकल्या आणि त्यांना पाच-दहा मिनिटं मस्त शिजू दिलं.

शेताच्या कडेला मांडलेला आमचा छोटासा स्वयंपाक.
शेताच्या कडेला मांडलेला आमचा छोटासा स्वयंपाक.

मग आली खरी वेळ...

मॅगी आणि मसाल्याची.

ते दोन्ही टाकून पुन्हा दहा मिनिटं उकळत ठेवलं.

तोवर आमच्या गप्पा रंगल्या होत्या.

मस्ती सुरू होती.

आणि त्या सगळ्यात आमच्याकडे अजून एक पाहुणा आला होता.

एक Doggy Bhai.

साहेब पूर्ण वेळ आमच्या मॅगीकडे इतक्या लक्षपूर्वक बघत होते, जणू शेवटी त्यांच्याही वाट्याला एक वाटी येणार होती.

शेवटी मॅगी तयार झाली.

पण नेहमीप्रमाणे आमच्यातला एक वेगळाच.

"मला मसाला मॅगी नको... मला साधी काढून द्या."

त्याच्यासाठी आधी साधी मॅगी वेगळी काढली.

मग उरलेल्या मॅगीत घरून आणलेला मसाला टाकून पुन्हा थोडी उकळली.

आणि आता...

खरी मसाला मॅगी तयार होती.

घरून आणलेला मसाला घातलेली — दिवसातली सर्वात भारी मॅगी.
घरून आणलेला मसाला घातलेली — दिवसातली सर्वात भारी मॅगी.

त्या गरमागरम मॅगीचा पहिला घास...

समोर तांदळाची शेती...

आजूबाजूला थंडगार हवा...

खरंच, त्या क्षणाचं सुख शब्दांत सांगणं कठीण आहे.

मॅगी संपेपर्यंत कुणी फारसं बोललंच नाही.

बहुतेक सगळे त्या वातावरणाचा आणि त्या गरमागरम मॅगीचा मनापासून आनंद घेत होते.

मॅगीनंतर भांडी धुऊन झाली आणि लगेच पुढचा कार्यक्रम सुरू झाला.

चहा!

पुन्हा पाणी उकळायला ठेवलं.

घरून आणलेली चहापत्ती टाकली.

एक अख्खं आलं ठेचून त्यात टाकलं.

दहा मिनिटं मस्त उकळलं.

मग दूध घातलं.

थोड्या कसरतीनंतर शेवटी आमचा Camping Style चहा तयार झाला.

आलं ठेचून घातलेला Camping Style चहा.
आलं ठेचून घातलेला Camping Style चहा.

सगळे निवांत बसून चहाचा आस्वाद घेत होतो.

तेवढ्यात पुन्हा तीच पांढऱ्या साडीवाली मुलगी तिथे आली.

आमचे गडी भांडी धुवायला गेले होते, म्हणून मी निवांत बसून त्यांचं शूटिंग पाहत होतो.

एक Reel शूट करायला तब्बल चार-पाच जणांची Team आली होती.

त्यातल्या एका मुलाचा पूर्ण हात निळ्या रंगाने रंगवला होता.

त्यावर शिवजींचा हात दाखवण्याचा Effect तयार केला होता.

बहुतेक Reel चा शेवटचा Shot असावा.

तो मुलगा तिच्या डोक्यावर हात ठेवत होता आणि ती डोळे मिटून नमस्कार करत होती.

मी ते सगळं शांतपणे पाहत बसलो.

पण आता मात्र खरंच निघायची वेळ झाली होती.

सगळं आवरून आम्ही गाड्यांकडे परत आलो आणि तिथेच पुन्हा एक छोटासा किस्सा घडला.

एका Scooty ला चावी तशीच लावून काही मुली तिथून निघून गेल्या होत्या.

पहिल्यांदा तर आम्हालाच थोडी चिंता वाटली.

"अरे... कुणी गाडीच घेऊन गेलं तर?"

आमच्या डोक्यात विचार सुरू असतानाच दोन मुली धावत धावत परत आल्या. त्या सरळ Scooty जवळ गेल्या आणि चावी काढू लागल्या.

मीही संधी साधत म्हटलं,

"अहो... तुमचीच का ही किल्ली? आम्ही किती वेळापासून इथे थांबलो होतो, कुणी गाडी घेऊन जाऊ नये म्हणून."

खरं तर आम्ही नुकतेच तिथे आलो होतो.

पण थोडीशी थट्टा-मस्करी करायचा मोह काही आवरला नाही.

त्या हसल्या...

आम्हीही हसलो...

आणि मग पुन्हा एकदा गाड्या सुरू झाल्या.

परतीचा प्रवास सुरू झाला होता, पण माझं शूटिंग अजून संपलेलं नव्हतं.

थोडं पुढे गेल्यावर पुन्हा माझा Reels चा कार्यक्रम सुरू झाला.

"अरे इथून एक Video घे."

"थांब... आता गाडी चालवत असतानाचा Shot घे."

"हा Angle भारी दिसतोय... पुन्हा करू."

असं करत करत आम्ही पुन्हा थोडा वेळ फोटो आणि व्हिडिओमध्ये रमलो.

तेवढ्यात आमच्या गडीने माझ्याकडे बघून एक Dialogue मारला...

"सार्थी... तुला तुझ्याइतकीच Energetic बायको मिळाली तर ठीक आहे... नाहीतर अवघड आहे तुझं!"

क्षणभर सगळे हसायला लागलो.

मीही काही उत्तर दिलं नाही.

मनात म्हटलं...

चल... Compliment म्हणूनच घेतो.

आणि पुन्हा गाडी पुढे निघाली.

आता मात्र दिवसाचा सगळा थकवा जाणवायला लागला होता.

सकाळपासून फिरणं...

मधे मधे फोटो...

व्हिडिओ...

ट्रेक...

मॅगी...

चहा...

सगळंच झालं होतं.

म्हणून आता कुठेही न थांबता सरळ घरी जायचं असंच ठरलं.

पण आमच्या गडींनी शेवटचा गोंधळ घातलाच.

रावेतकडे वळायचं सोडून त्या सरळ पुढेच निघून गेल्या.

शेवटी मी हसतच म्हटलं,

"आता तुम्ही या तुमचं तुमचं... मी जातो घरी!"

आणि मी माझ्या रस्त्याने निघालो.

सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ही ट्रिप...

रात्री जवळपास आठ वाजता संपली.

एका दिवसात किती काय काय घडलं...

चुकीचा रस्ता पकडला...

परत फिरलो...

डोंगर, धबधबे, हिरवाई अनुभवली...

घाटेश्वरचं शांत मंदिर पाहिलं...

भटजींबरोबर छोटासा वाद झाला...

शेताच्या कडेला बसून गरमागरम मॅगी बनवली...

त्याच जागी चहा केला...

एका Doggy Bhai ने पूर्ण वेळ आमच्या स्वयंपाकावर लक्ष ठेवलं...

पांढऱ्या साडीवाल्या Reel Team चा Comedy Show पाहिला...

Scooty ची किल्ली विसरलेल्या मुलींशी थोडी मस्करी केली...

आणि शेवटपर्यंत Reels चं शूटिंगही सुरूच ठेवलं.

दिवस संपला...

पण मन मात्र अजूनही त्या रस्त्यांवरच अडकलं होतं.

त्या नागमोडी घाटात...

त्या धबधब्यांच्या आवाजात...

त्या भातशेतीच्या कडेला बसून खाल्लेल्या गरमागरम मॅगीमध्ये...

आणि त्या चहाच्या प्रत्येक घोटात.

बाकी...

या ट्रिपमधलं सगळ्यात भारी काय असेल, तर ते म्हणजे...

सोबत आलेली ही दोन भूतं!

त्यांच्याशिवाय ही ट्रिप इतकी मजेशीर झालीच नसती.

अशीच एक भन्नाट ट्रिप पुन्हा कधीतरी होईलच.

तोपर्यंत...

फिरत रहा...

मजेत रहा...

आणि Chill रहा!